देव वसे चित्तीं ।त्याची घडावी संगती ॥

अभंग:
देव वसे चित्तीं ।
त्याची घडावी संगती ॥१॥
 ऐसें आवडतें मना ।
 देवा पुरवावी वासना ॥ध्रु.॥
 हरीजनासी भेटी ।
 नहो अंगसंगें तुटी ॥३॥
 तुका म्हणे जिणें ।
 भलें संतसंघष्टणें ॥४॥

अभंगाचा भावार्थ:-
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या माध्यमातून भगवंताशी संवाद साधतात. भगवंताविषयीच बोलतात.
भगवंताला म्हणतात, हे देवा माझ्या अंतःकरणात काही भाव आहेत. ते मी तुझ्या समोर व्यक्त करतो. ज्याच्या चित्तामध्ये भगवान परमात्मा कायमस्वरूपी वास्तव्य करतो ना, मला त्यांची संगती घडावी.
देव वसे चित्ती | त्याची घडावी संगती ||
कारण, त्यांच्या संगतीत रहायला माझ्या मनाला आवडते. तेच माझ्या मनाला प्रिय वाटते. म्हणून हे भगवंता माझ्या मनातील तीच एक इच्छा पूर्ण करावी. अन अखंड मला संतांच्या संगतीमध्ये ठेवा. मला दुसरे काहीच नकोय. फक्त अखंड संतांची संगती असावी. एवढीच एक माझी इच्छा पूर्ण करावी. 
ऐसे आवडते मना | देवा पुरवावी वासना ||
 हरि जनांच्या संगतीत म्हणजेच हरि भक्तांच्या संगतीत राहणे हे फार विलक्षण आहे. म्हणून हरि भक्तांची संगती ही अखंड घडत रहावी. कधीच त्यांचा अन माझा वियोग होऊ नये असेच नेहमी वाटत असते.
हरि जना सवे भेटी | न हॊ अंगसंग तुटी ||
कायम हरि जनांच्या संगतीत असावे. सदैव त्यांच्याच चरणांजवळ असावे असेच वाटत असते. त्यांचा हात माझ्या मस्तकावरून फिरावा. असा अंगसंग असे सानिध्य मला त्यांचे घडून यावे. अन असेच सानिध्य कायमस्वरूपी घडून येत राहो असे माझ्या मनाला वाटते. एवढीच इच्छा माझ्या अंतःकरणात आहे. कारण हरि भक्तांच्या संगतीत जगणे राहणे हेच खऱ्या अर्थाने जगणे आहे.
तुका म्हणे जिणे |
भले संतसंघष्टणे ||
सांसारिक परिस्थितीतील जगणे हे केवळ त्रासदायक आहे. त्यातील जगणे म्हणजे फक्त वेदना सहन करणे आहे. म्हणून भगवान परमात्म्याची संगती जर प्राप्त करून घ्यायची असेल. भगवंताचे प्रेम आनंद जर प्राप्त करून घ्यायचे असेल तर मग जे अखंड भगवान परमात्म्याच्या सानिध्यात आहेत. त्यांच्या संगतीत आपण गेले पाहिजे. त्यांच्या संगतीत आपण गेलो तर वेगळे काही परमात्म्याच्या संगतीत जावे लागणार नाही. भगवान परमात्मा आपोआपच त्यांच्या संगतीत भेटेल.
बैसता संतांचे संगती | कळो आले कमलापती ||
तो कमलापती भगवान परमात्मा संतांच्या संगतीत भेटतो. त्यांच्या संगतीत आनंद प्राप्त करून घेता येतो. म्हणून भगवंताच्या प्राप्तीसाठी आनंदासाठी संतांची संगती हेच महत्वाचे आहे. ही संतांची संगती सहजपणे प्राप्त होणारी नाही तर संतांची संगती ही फार दुर्लभ आहे. म्हणून हे भगवंता, तू जर कृपा केलीस तरच मला या संतांची संगती अखंड प्राप्त होईल. म्हणून मी तुझ्यासमोर विनंती करतो कि, ज्याच्या चित्तात अखंड भगवान परमात्माच आहे. अशाच हरि भक्तांची संगती मज घडो. अशी प्रार्थना जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या माध्यमातून करतात.
__गुरुवर्य श्रीकृष्णकृपांकित🙏🏻🌸🌷
चिंतनाची लिंक
रामकृष्णहरि🙏🏻🌸🌷

Comments

Popular posts from this blog

संतसंगतीचे काय सांगू सुख

सत्यवादी व्यवहार हीच भगवान परमातम्याची पूजा